!​​! ​वाळलेल्या झाडाची गोष्ट ​!!

काही दिवसांपूर्वी एक झाड पाहिलं
भर पावसाळयात वाळलेलं
सगळीकडे हिरवं हिरवं असतांना
आपली सगळी पान गाळलेल
विचार करत होतो
काय म्हणून अस याला बोचलं
असं काय जिव्हारी लागणारं असेल टोचल
की हे जगण्यावर असं रुसलं
सृष्टिचा उत्सव ऋतू सुरु असताना
हे त्याच्याकडे पाठ करून का बसलं ?
त्या झाडाखाली एक म्हातारी
भाजी विकत बसायची
सगळी बहरलेली झाड सोडून
ती या वाळलेल्या झाडाखालीच असायची
बहुधा तिला या झाडाबद्दल
मनोमन जिव्हाळा वाटायचा
त्याच्या वाळलेल्या खोडावरून हात फिरवताना
तिला जसा जवळचा नातलग भेटायचा
एकदा तिला भेटून बोललोच
म्हणाली, पोरा , आधी पासूनच इथेच बसायचे
वाळल, सुकलं, म्हणून सोडून दिल्यावर
कस वाटता तुला नाही रे कळायचं
दाट सावलीच होत आधी हे ही झाड
दिवंसोदिवस पडत होती याच्या पण सौंदर्यात वाढ
कुठून काय माहित एक जुईची वेल याच्या पायथ्याला उमलली
आधाराला म्हणून याच्या खोडाला बिलगली
दिवसा मागून दिवस जात होते
जुई जशी बहरत होती
फांद्याना मिठी मारून
कशी शेंड्याला लहरत होती
जुईच्या सुगंधाने
सगळं झाडच कसं मोहरलं होत
झाडाचा आधार घेता घेता
त्यांच प्रेम बहरलं होतं
एके दिवशी कोणी तरी
जुई मुळातूनच उपटलेली
जीव जात असताना
ती तशीच झाडाला लपेटलेली
उन-पावसापासून वाचवलेली जुई
झाडाच्या अंगा-खांद्यावर गेली
तिची पान-फूल गळतांना पाहून
झाडाची पण जगण्याची इच्छा मेली
अश्रू ढळावेत तसं मग
झाडानेही एक एक करून पान गाळल
अन पाहता पाहता एक दिवस
भर पावसाळ्यात झाड वाळल
~ दीपक इंगळे