दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला
मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला
चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला
नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला
लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला
मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला
मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला
भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला
मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

No comments: