मी सखाराम गटणे

"मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणाऱ्या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला.
अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही. त्या एवढाल्या वाड्यात, आजारी आजी आणि घनघोर बाप सोडला तर फक्त मी आणि आईची मागे राहिलेली पुस्तकं. आसपास कोणी माझ्या वयाची मुलंही नव्हती. त्यामुळे पुस्तकं वाचणं आणि न आठवणाऱ्या आईच्या आठवणींत बुडून जाणं एवढाच दिनक्रम उरला.
आप्पा दिवसभर त्यांच्या दुकानांवर. घरी यायचे ते पण रात्र उलटून गेल्यावर. मला कधी मारलं नाही हे खरं, पण त्यांचा दराराच एवढा होता, की माझ्या हातून कुठलीच चूक होणं शक्य नव्हतं. आईवेगळ्या मुलाला वाढवताना फक्त शिस्तच पुरेशी नाही हे त्यांना बहुधा कळत असावं, पण मायेनं बोलणं त्यांना जमायचं नाही. दिवसभराच्या दगदगीतून घरी आल्यावर मी काही खोड्या करत नाही, एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. तेव्हा मी असून नसल्यासारखाच. कधीतरी मध्येच कितवीत आहेस, प्रगतिपुस्तक बघू वगैरे रुंद गडगडाटी आवाजात चौकशा होत. मनातल्या मनात मी त्यांना 'आप्पा बळवंत' नाव ठेवून दिलं होतं. खरं तर त्या चौकात आप्पांचं दुकान आहे, म्हणूनच त्याला तसं नाव पडलं अशी माझी बरेच दिवस पक्की समजूत होती.
अशा वेळी कधी सठीसामाशी येणारे पाहुणे, आप्पांचे मित्र वगैरे घरी आले; की जरी मला बुजायला झालं तरी फार बरं वाटायचं. माझ्या सद्गुणी स्वभावाचं, वाचनाच्या वेडाचं खूप कौतुक व्हायचं. मग एरव्ही एका गोड शब्दाला पारखा असलेला जीव फुलून यायचा. लोक आपल्याला चांगला म्हणताहेत, तेव्हा आपण जसे वागतोय तसंच वागत राहिलं पाहिजे असं काहीसं तेव्हा माझ्या मनानं घेतलं असावं. शाळेतल्या इतर मुलांपासून मग अधिकच वेगळा पडू लागलो. कुणी शिव्या दिल्या, मस्ती केली तर त्यांना मनातल्या मनात नाक मुरडू लागलो. माझ्या तेव्हाच्या पुस्तकी भाषेत बोलायचं झालं तर, साने गुरुजींची माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात अशी प्राणप्रतिष्ठा झाली.
मला वाटतं, त्या वयात कोणी तरी एक हिरो लागतोच. आजच्यासारखा त्या काळात सिनेमा, क्रिकेट, नाटकं यांच्यात हिरो शोधायचा पर्याय तेव्हा नव्हता. आपसूकच साहित्यिकांना 'फॉलो' करू लागलो. व्याख्यानांना जाऊ लागलो. उगाच प्रगल्भता, अल्पाक्षररमणीयता, विचक्षण, नेणीव, आल्हाददायक, विश्रब्ध, हृदयंगम असले शब्द कानावर पडले की पोपटासारखा त्यांचा अर्थ न समजता त्यांचा वापर करू लागलो. 'पण'च्या ऐवजी परंतु, खरं तर'च्या ऐवजी 'वस्तुतः' असं कृत्रिम लिहून, निरर्थक मोठमोठे शब्द वापरून 'गटणेचं मराठी चांगलं आहे' असं कौतुक शाळेत पदरात पाडून घ्यायची सवय लागली.
तेव्हाचे बहुतेक लेखक म्हणजे आदर्शवादाने भारलेले. त्यांना शिष्य मिळाला तोदेखील माझ्यासारखा. मग काय? जिथे तिथे जीवनविषयक सूत्रे शोधायची खोड लागली. 'योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत नाहीत' ऐकल्यापासून फक्त बोधप्रद पुस्तकेच वाचायची ठरवलं. बोजड पुस्तकं, काही कळत नसताना 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' असं मनाशी घोकत घोकत वाचली. सेल्फ-पिटी म्हणतात तसं, स्वत:लाच 'परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे' असं समजावू लागलो.
असंच एक दिवस एका नवीन लेखकाचं व्याख्यान होतं. त्यांची तोवर छापून आलेली प्रत्येक ओळ जरी मी वाचली असली तरी 'या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही' ही ओळ माझ्या विशेष आवडीची होती. आप्पांच्या अंगवस्त्रांची गावभर होणारी चर्चा माझ्या तेव्हा कानी असेल म्हणून किंवा त्या अडनिड्या वयातील एक मूड स्विंग म्हणून असेल, पण ते वाक्य वाचल्यानंतर त्यांना भेटायचंच हे ठरवलं होतं. त्यांच्या व्याख्यानाला गेलो, त्यांची स्वाक्षरी घेतली आणि मार्गदर्शन घ्यावं म्हणून त्यांच्या घरीही गेलो. असो, पुढची गोष्ट मी पुन्हा सांगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हा सगळ्यांना ती चांगलीच ठाऊक आहे.
अगदी रातोरात नसलं, तरी माझं नाव, माझी बोलायची पद्धत, डबक्यावर शेवाळ साठावं तशा शब्दांत पुस्तकांचा केलेला पंचनामा इथपासून ते साने गुरुजींचा फोटो, माझं लग्न, मुलाचा जन्म इथपर्यंत सारं काही जगजाहीर झालंय. माझं नाव घेऊन मग अलंकारिक शैलीचा सोस असणाऱ्या, पुस्तकांच्या जगात नुकतंच पाऊल पडलेलं असलं तरी सारं काही वाचून झालेलं आहे अशा भ्रमात वावरणाऱ्या तरुण कुमार मंडळींना मग 'गटणे' म्हणून चिडवण्याची फॅशनच पडून गेली आहे. अजूनसुद्धा पाचवीतला नातू शाळेत मला 'गटणे' म्हणून चिडवतात अशी तक्रार घेऊन कधीकधी घरी येतो.
माझं खासगी आयुष्य असं जाहीर झाल्याबाबत, किंवा माझं नाव ही एक चिडवण्याची गोष्ट बनल्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आयुष्य ('जीवन' म्हणायचे तेव्हाच सोडले) ही काही फार सीरियसली घ्यायची गोष्ट नाही, हे जरा उशीरानेच का होईना पण समजलं खरं. तेव्हापासून उगाच कुढत राहून शिष्ट मोठेपणा मिरवण्यापेक्षा वागण्यात बराच मोकळेपणा आला. जमेल तितकं जग पाहिलं, कधी आदिवासी वस्त्यांत राहिलो तर कधी परदेशात. शक्य तेवढे वेगवेगळे अनुभव घ्यायचा प्रयत्न केला. पूर्वीच्या भिडस्त मध्यमवर्गीय चाकोरीबाहेर पडायचा प्रयत्न केला. उगाचच 'जीवन त्यांना कळले हो' वगैरेचा आव आणत नाही, पण पूर्वी आपण अगदीच 'हे' होतो, हे मात्र जाणवलं आणि मग जरा सुधारायचा प्रयत्न केला.
सध्या मुलगा पेढीवर बसतो. हो, सोनगावकर सराफांच्याच. देशाबाहेरही धंदा वाढवण्याचे प्लॅन्स आहेत. मी आणि ही, आमच्या माथेरानच्या बंगल्यात निवांत राहतो. साने गुरुजी, पु. लं. यांची पारायणं केव्हाच झालीत. पण बाबा कदम, भाऊ पाध्ये, नेमाडे करत करत सध्या कमलेश वालावलकर, मकरंद साठे वाचतोय. (अगदीच जर दम्यासारखी जुनी सवय उबाळून आली तर वपु वाचतो.) वेगळं लिहितात फार. बाकी, नातवंडं मजेत आहेत. मुलगा-सून कर्तबगार आहेत. सारं काही 'एथास्थित' सुरू असल्याचा टिपीकल मध्यमवर्गीय स्मगनेस अलीकडे फारच जाणवतो.
असो, काही वर्षांपूर्वी भाई गेले. ते असेपर्यंत दर दसऱ्याला त्यांच्या घरी जाऊन सोने द्यायचो. 'कधीच सीमोल्लंघन केले नसले तरी न चुकता सोने देणारा माणूस' या जुन्या विशेषणाने सुरुवात व्हायची आणि मग 'केतकी पिवळी पडली' पासून 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' पर्यंतच्या त्या आठवणींना उजाळा मिळायचा. आता अगदीच आठवण आली तर त्यांची 'सखाराम गटणे'ची कॅसेट लावून बसतो. आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिऱ्हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. " - सखाराम गटणे

3 comments:

अनु said...

निलेश राव, आपल्या या लेखाचा मूळ स्रोत हा आहे. आपण माहिती जपून ठेवून आमच्यापर्यंत पोहचवता हे उत्तम,या लेखाचा मूळ स्रोत
http://marathisahitya.blogspot.com/हा आहे हे आपल्याला माहिती आहेच.आपण जमा केलेल्या लिखाणांचे मूळ स्रोतही(आपल्याला माहिती असल्यास )इथे नमूद केलेत जर जास्त चांगले होईल असे वाटते.

Nandan said...

dhanyawad anu. nilesh rav, krupaya mooL lekhacha ullekh (duva - http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html) aapaN yaa post madhe karaavaa.

Anonymous said...

पांड्या...पांड्या ढापलंस की रे...!