माझ्यातला 'मी'..!!

असेनही जरी मी , रस्त्याच्या कडेस निर्जीव थिजलेला...
काळाकुटट, ओबडधोबड, दगड एकाकी निजलेला !
पण, लाभला जर एखादा चुकार पावसाळी स्पर्श,
तर दिसेल तुम्हाला...
माझ्याही खाली, एक हिरवा ओला अंकुर अलगद रुजलेला!

मी कोरडा, भगभगीत,उन्हाच्या रापाने भाजलेला...
चिडका, तापट, भेसूर, माझ्याच व्यापाने झिजलेला !
पण कधी आलीच एखादी, हळवी गार झुळूक,
तर दिसेल तुम्हाला...
एके काळी, विरहवेळी, पाऊसही माझ्या अश्रूत भिजलेला !

मी पापपुण्याच्या अध्यात्माला सदैव बुजलेला...
नास्तिकतेच्या रोगाने, नको इतका सुजलेला !
पण निनादली जर घंटा दूर कुठे राऊळी,
तर दिसेल तुम्हाला...
मनाच्या गाभाऱ्यात, मी ही देव गुपचूप पुजलेला !

मी रांगडा, निर्लज्ज म्हणून सांप्रत गाजलेला...
बेबंध वळू, सराईत कोडगेपणाने माजलेला!
पण फिरलेच कधी मोरपीस गालावरून,
तर दिसेल तुम्हाला...
तिच्या एकाच कटाक्षाने, मी कधी लाल होऊन लाजलेला !

आज जरी मी कित्येक बदलांनी सजलेला...
जगाने हजार मापे लावून हवा तसा मोजलेला!
पण मागे वळून पहिलेच कधी,
तर दिसेल तुम्हाला...
जिवंत म्हणून पेटताना...माझ्यातला 'मी' कधीच विझलेला...!!

No comments: