** झिंग **



आरशाला लपवणे जमलेच नाही
सावलीला थांबणे जमलेच नाही

जगी त्यांनीच सोडली मदिरा
ज्यांना झिंगणे जमलेच नाही

मूक ओठी पडले व्रण रातभर
नाबोलणे जमलेच नाही

ब्रम्हकमळात जीव रमला सदा
सूर्यफुलात गुंतणे जमलेच नाही

संगे चिऊ तर कधी मोतीही येतो
कधी एकटे जेवणे जमलेच नाही

नंगी कट्यार हसते ज्यांच्या मुठीत
मला त्यांना कवळणे जमलेच नाही

खुशाल चिरली त्यांनी माणसे सपासप
मला हात बुडत्याचा सोडणे जमलेच नाही

माणसांनीच झपाटले इतुके आता
भूतांनाही जे करणे जमलेच नाही

यमालाही काल उभा दाराबाहेर केला
यारांची मैफल मोडणे जमलेच नाही

No comments: