** राधा **




राधा मी , सखी मी, प्राप्ती मी मोक्षाची
राधा मी , भक्ती मी ,शक्ती मी कॄष्णाची

चंद्रमुखी मी , पौर्णिमा , चकोर चकित सुनैना मी
अमृते मुखकमल धुवूनी दशदिशा उजळिते मी
राधा मी..

दामिनी मी , चपला , चक्रधारीस आव्हान मी
रागे भरता दिनकरावर , ब्रम्हाची नवसॄष्टी मी
राधा मी..

रासेश्वरी मी , सुंदरा , रसिक शिरोमणीची रती मी
उत्कट , निर्मल, आत्मिक प्रेमाची व्याख्या मी
राधा मी..

वियोगिनी मी , विरहा , पुरुषोत्तमाची पूजक मी
दिली बन्सी मुरलीधराने जिस ती भाग्यश्री मी
राधा मी..

प्रिया मी , अमरा , जगन्नाथ तो वैश्विक , अणू मी
देहोत्सर्गी कृष्ण ह्रदयी विराजित एकमेव कॄष्णा मी

राधा मी , सखी मी, प्राप्ती मी मोक्षाची
राधा मी , भक्ती मी ,शक्ती मी कॄष्णाची

No comments: