** जमेल का रे **




हरखले मी हरखले, भान ही हरपले
अचंभित मी , स्तंभित मी

ऐकूनी हरी वाणी
कृष्ण मुरारी बनवारी
अवतरेल राम अवतारी ?
हरखले मी हरखले, भान ही हरपले..

रस रसाळ बोल तुझे रे , असे पण मन चंचल
जमेल का रे , जमेल का तुज हे महा कठीण व्रत ?

फुटी तांबडे , यमुनेला येशी
फोडी घागर , वस्त्रं पळविशी
गोपांसंगे माखन लुटशी
जमेल का रे , जमेल का अता ना करणे बरजोरी
वनी तरुतळी , ना छेडणे मुरली ?
कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

अनाहताचे सूर घुमले, थरथरले पाणी
जमेल का रे , जमेल का तुज गाणे मूक गाणी ?

नको दुष्ट बोलणी , नको निर्वाण वाणी
मन रंगीत करतो , तन संगीत बनतो
पर असू दे ना हे सारे फक्त मजसाठी
जमेल का रे , जमेल का अता ना रंग उधळणे ?
जनी वृंदावनी , ना रास रचणे ?
कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

कशास दूजे नाम स्मरणे, नको उध्दाराचे बहाणे
जमेल का रे , जमेल का तुज राधाकृष्ण होणे ?

कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

No comments: