तुझी सावली…

आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली…
केसातील मोगरा दरवरळा,
त्या गंधाने जीव बहरला,
न सांगता जी परत फिरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
आज पहाटे झोपाळ्यावर
तू घेत होतीस झोके,
कसे सांगू कितीदा चुकले
माझ्या काळजाचे ठोके,
बांगड्यांची किणकिण तुझ्या
अजुनही माझ्या कानी,
आठवतात अजुनही मजला
तु गायलेली गाणी,
अजुनही जी घरभर व्यापून उरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
वाटले तुझ्या चेहऱ्याच्या चंद्राला
ओंजळीत घ्यावे,
मन भरून, जीव ओतून
प्रेम तुला द्यावे,
चांदण्यांचे अंग तुझे
डोळे भरून प्यावे,
जवळ येवून तुला घट्ट मिठीत घ्यावे,
तेवढ्यात पावसाची सर आली,
माझी स्वप्ने भिजून गेली,
थोडासा रुसलो मी अन
स्वतःशीच हसलो.
जडला कसा हा जीवघेणा ध्यास,
सगळीकडे फक्त तुझाच भास,
पण भास तरी म्हणू कसे?
सकाळी अंगणात होते
तुझ्या पावलांचे ठसे,
आता तरी खरे सांग,
आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली…

No comments: