माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी ओठांवर तिच्या
नाव माझे खुले,
रोजचे परी नव्याने
मजला मी मिळे,

माझ्यातच गुंतली ती, आपसूक आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी केसांत तिच्या
अडकता मी जरासे,
शहाऱ्याचे मोरपीस
फिरविते ती जरासे,

हळुवार मऊ हात, मग केसांत आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी गालांना तिच्या
स्पर्शिता मी अचानक,
मधुघटिका रित्या किती
मोजली ना मी एक,

चिंब चिंब पावसाची, कशी बरसात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी डोळ्यांत तिच्या
खोल खोल बुडता मी,
गूढ त्या डोहांमधून
काळजात उतरता मी,

न कळे कोण कुठे, मी आरशात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

No comments: