"एक चित्र"


(एवढ्यात एक चित्र माझ्या पाहण्यात आलं, त्याला कसला तरी पुरस्कार मिळाला होता. त्यामधे भर उन्हामधे एक छोटं बाळ निपचित पडलं आहे, मृत्युच्या दाराशी जणू. दुष्काळी उन्हाळ्याचा तो एक बळी असावा. आणि एक गिधाड दुरुन त्या मुलाकडे बघत आहे, त्याच्या मरणाची वाट बघत. ते बघून एक विचार आला मनात, तो खाली मांडलाय)


ऊन हसतंय, बेभान हसतंय
एवढं की जमिनीच्या डोळ्यातही पाणी नाही

कुठे आमरस, तर कुठे आईसक्रीम
कुणाकडे मात्र चतकोर भाकरही नाही

कुठे एसी ची थंड झुळुक , फ़्रीजचे गारगार पाणी
मृत्युच येथे कूलर, साधी जगायचीही सोय नाही

फ़िरंगी मंडळीना याचेच मोठे कौतुक
काय समजावं, ही गरिबी एवढी सुंदरही नाही
मोठमोठे पुरस्कार त्या फ़ोटोना लाभतात
जल्लोश करायला येथे स्मशानाचेही भाग्य नाही...

No comments: