धरणी माय....

धरणी माय....

कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला,
जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला,
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??
डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे
हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??
विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले
वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले
उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले
चटके देऊनी मातेला, उपकारांचे पांग फेडले
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, निसर्ग संपत्ती म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??
विचार सर्वांनी हवा करायला,
आळा घालूया वाढती लोकसंख्या व प्रदूषणाला,
सुरुवात करू स्वतापासून ,मग लागेल समाजही बदलायला
चक्र हे थांबविण्यासाठी
कामाला लागू झटकून हात अन पाय
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??

No comments: