विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?

विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?
पूर्वजन्माची ती कहाणी |
एक राजा आणि एक राणी ,
गात होते मधुर गाणी ||
एकांकी जीवनात माझ्या अवतरली एक परी ,
घेउनी गेली ती मजला तिच्या स्वप्ननगरी ,
सुखावले नयन पाहून ती सुंदर जादुगरी |
प्रेमात तिच्या मोहरून स्तब्ध झाली वाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?......
पण , विघ्न येता ताटातूट झाली ,
सारी मधुर स्वप्ने विखुरली ,
गाठ जन्मभराची क्षणातच सुटली |
वदविता ना आली मजला व्यथा केविलवाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?......
माहित होते मजला स्वप्नं हे भंगणार ,
काळोख्या आशेतच मला जन्मभर कोंडून ठेवणार ,
रहस्यमय जीवनाचे हे कोडे कसे उकलणार ?
अक्रोशातच संपणार हि रात्र जीवघेणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?.......
नंतर नवे मार्ग दिसले , नव्या दिशांनी सावरले ,
स्वर घायाळ मनाचे दुसरे कुठेतरी गुंजले ,
अंधाऱ्या रहस्याचे उत्तर आता सापडले
आणि सुरु झाली एक नवी कहाणी ,
पण .......विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?....

No comments: