मृत्युंजय संगरी




धड धड धड रथचक्र निघाले, उधळीत धूळ अंबरी,
अवतरला......मृत्युंजय संगरी

मित्राच्या वचनास जागतो, दिला शब्द तसेच वागतो...
कवच कुंडले सहज त्यागतो,
स्वाभिमानी असून ठरला...जो अहंकारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

अवध्य नाही, ज्याला माधव,तुच्छ गांडिव, दुर्बळ पांडव...

स्पर्शला ज्या, कवचीत पराभव...
आसूड होऊन बरसे घेऊन...सूड जो अंतरी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

पराक्रमी जो....जो महादानी, असा जन्मला नाही कोणी...
परशुराम शिष्योत्तम असुनी...
कपटाने लढला, महारथी... तो अत्याचारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

सज्ज होइ म्हणे अर्जुना, सावध करतो तो श्रीकृष्णा
नव्हेच पोकळ रणगर्जना...
सूत पुत्र का उगाच झाला...कौरव सेना अधीकारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

जसे वीजांचे ...चाले तांडव, तसे भयंकर लढती बांधव...
युद्ध निर्णय...होय असंभव...
कोण डावा..कोण उजवा...सर्वश्रेष्ठ धनुर्धारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

इंद्रवज्र अन् सुर्यकिरण हे... पुन्हा न व्हावे...असेच रण हे...
साशंकीत का आज मरण हे..
प्रशनचिन्ह का प्रथम उमटले...असे कुरुक्षेत्री !
अवतरला......मृत्युंजय संगरी

बाण थकले...त्राण ही नाही... प्राण आता...कंठाशी येई...
शक्ती संपली ...युक्ती न काही,
कुणी न पुढती येतो, जातो... कुणी न माघारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

शाप गुरुचा घातक ठरला, अस्त्रे शस्त्रे कर्ण विसरला...
दैवगतीचा फेरा कसला ?
त्यात रथाचे चाक अडकले....धरतीच्या उदरी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

हताश राधेय उतरे खालती, घाम ओघळे...भाळावरती...
सांगे तेव्हा...पार्थसारथी...
हीच संधी, आहे अर्जुना...
सोड नियम अन् शस्त्र घे हाती...दुश्कुर्ती संव्हारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

बाण ताणला...स्मरुन देवता, मृत्युंजय मृत्युस भेटता...
धडावेगळे शीर जाहले..
पुत्र कुंतीचे पाच राहीले..
एक संपले शापित जीवन...स्वकुळास उद्धारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

No comments: