आज तुला सोडून ऑफिसला जाताना पुन्हा पायात अडखळतेय...

आज तुला सोडून ऑफिसला जाताना
पुन्हा पायात अडखळतेय...
ट्रेनसाठी धावायचे सोडून
पुन्हा घराकडे वळतेय...

निघताना घेतलेली तुझी गोड पापी
अजून ओठांवर हुळहुळतेय...
आणि तुझ्या मुठीत तू घट्ट
पकडलेलं माझं बोट
मी अजून सोडवतेय...

तुझ्या मुखरसाने भिजलेली
माझ्या ड्रेसची बाही
मी अजूनही वाळवते...
तू काय करत असशील...
कशी असशील?
स्वतःला पुन्हा पुन्हा विचारतेय...
फोनची बटण दाबतेय...



लवकर लवकर दिवस संपू दे म्हणून

देवाला पुन्हा पुन्हा आळवतेय...
माहितेय ग मला,
मी खूप खूप कमी पडतेय...
आणि याच भावनेनं गं मी
आतल्या आत झुरतेय....

पण काय करू गं लाडके,
हेही सारं करावयालाचा हवं...
जगण्यासाठी जगण्याचं
मोल वेचायलाच हवं...
मोल मोजायचा म्हणून आणि म्हणूनच
कमवायलाच हवं...

आणि राणी, तुला खूप खूप शिकवून मोठ्ठ
करायचंय म्हणून... अडखळत का होईना,
उद्याही मला ऑफिसला जायलाच हवं...!

No comments: