सांजगुंफण



चल आता आवरायची वेळ झाली
चल आता सावरायची वेळ झाली
संपले रे तिचे सोहळ्याचे चार क्षण
चल आता मावळायची वेळ आली

नको नेउस मना मला तिच्या मांडवात
श्वास घूसमटे हळदीच्या पावलात
मना माझे जगण्याशी गा-हाणे मांडू दे
मना थांब आसवांशी जरासे भांडू दे
थोडा क्षण राहिलेला तिला निघायला
तिला वेळ नाही थोडे मागे वळायला
खूप लांब उडायचे आहे तिच्या भाळी
कुंकवाचा धनी आता वसतो कपाळी
उमटू दे स्वरांतून उरातली थरथर
परत नाही ऐकू येणार तिला माझा स्वर
सनईचे सूर मला शेवटचे छेडू दे
भैरवीचे देणे मला शेवटचे फेडू दे

रित्या पावलांनी प्रवासास ती निघाली
चल आता आवरायची वेळ झाली
चल आता सावरायची वेळ झाली
संपले रे तिचे सोहळ्याचे चार क्षण
चल आता मावळायची वेळ आली !!!

No comments: