हात धर हातात अन चेहर्‍याकडे बघ दिसेल एका डोळ्यात...

हात धर हातात
अन चेहर्‍याकडे बघ
दिसेल एका डोळ्यात
तरंगणारा ढग

दुसरा डोळा गप्पगप्प
दुसरीकडे वळेल
अर्थ लावू नकोस
आपॊआपच कळेल

कितीक चिन्हं चेहर्‍यावर
येऊन जाऊन असतात
शब्दांवर विसंबणारे
सहजासहजी फ़सतात

चल उगी, तुझी वाट
तुझं वळण, तुझा घाट
तुझ्या मागे मागे येतील
आठवणींचे धागे सात

गुंतू नकोस
गुंफ़ू नकोस
हरवू नकोस
हरूही नकोस

समजेल त्याला कधीतरी
अर्थ तुझ्या मौनाचाही
मागेल तोही हात तुझा
बोलत राहील काहीबाही

हात धर हातात
अन चेहर्‍याकडे बघ
दिसतील दोन्ही डोळ्यांत
कोसळणारे ढग

No comments: